Nigdi : वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते – पुलकसागर महाराज

सकल जैन वर्षायोग समितीच्या दशलक्षण पर्व महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज – वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते. फक्त विषयांना सोडणे नाही तर ब्रह्मचर्यात लीन होणे आवश्यक आहे, असा उपदेश पुलकसागर महाराज यांनी उत्तम ब्रह्मचर्य या दशम गुणाविषयी विवेचन करताना मांडले. 

निगडी प्राधिकरण येथे सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने चातुर्मासानिमित्त दशलक्षण पर्व महोत्सव सुरु होता. त्याची सांगता करताना पुलकसागर महाराजांनी दहावे लक्षण म्हणजे उत्तम ब्रह्मचर्य यावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी सकल वर्षा योग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल,  कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अजित पाटील, वीरेंद्र जैन, भूपाल बसन्नावार, सुरगोंडा पाटील, चकोर गांधी, सुदीन खोत, विजय भिलवडे, संजय नाईक, जितेन शहा, वीरकुमार शहा, सुजाता शहा, प्रकाश शेडबाळे, अदिनाथ खोत आदी उपस्थित होते. तसेच नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, राजेंद्र बाबर, बांधकाम व्यावसायिक राजेशकुमार सांकला विशेष उपस्थित होते.

मागील दहा दिवस पुलकसागर महाराजांनी उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम शौच, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम आकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य या दहा गुणांविषयी विविध उदाहरणांसह विवेचन करुन भाविकांना मार्गदर्शन केले. महाराज पुढे म्हणाले की, परमात्मा आणि आपल्यामध्ये फक्त इच्छा, वासना, आकांक्षा यांचा पडदा आहे. तो दूर झाला की मग काहीच शिल्लक उरत नाही. मनुष्याचा जन्म वासनेतून होतो, ही जगाची अपरिहार्यता आहे. पण कामभावनेतच जगलो तर राम मिळणार नाही.

रामात जगलो तर जीवन सार्थक होईल. भोगात नाही त्यागात जगा ही भारतीय संस्कृती आहे. जो उत्तम ब्रह्मचर्य स्वीकारतो त्याला लवकर मोक्ष मिळतो. सर्व धर्म ब्रह्मचर्याला महत्व देतात. उत्तम ब्रह्मचर्य मन आनो, माता, सुता, बहन पहचानो. विषयांचा उपभोग ही भारतीय संस्कृती नाही. ते तर पशू करतात. आपण  मनुष्य आहोत. फक्त विषयांना सोडणे नाही तर ब्रह्मचर्यात लीन होणे आवश्यक आहे. नुसत्या वासना सोडणे नाही तर साधना आवश्यक आहे. या विषयी एक उदाहरण देऊन महाराज म्हणाले की, हीरा समोर दिसल्यावर आपल्या हातात असलेले रंगीबेरंगी, चमकदार खडे आपोआप गळून पडतात. त्याचप्रमाणे मनाला काबूत ठेवल्यास आपोआप वासना दूर होतात.

संतांच्या संगतीत मन पवित्र होते. चांगली पुस्तके वाचा, चांगले विचार आचरणात आणा. मंजिलोंपे जाके चिराग जलाना हमारा हैं हमारा काम, हवाका रुख हम नही देखते. चारित्र्याची ताकद खूप मोठी असते. विषयांचा भोग घेतल्यास कधीतरी विरक्ती, तृप्ती येईल. पण विषयांचा त्याग केल्यास तृप्ती नक्कीच मिळेल. नुसते जगणे नाही, कशाप्रकारे जगता याला महत्व दिले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.