Maval : मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार – बाळा भेगडे

मंत्रिपद तालुक्यातील दिवंगत ज्येष्ठ नेत्यांना समर्पित; शहिदांना आदरांजली

एमपीसी न्यूज : राज्यमंत्री झाल्यानंतर मावळ तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या लोणावळा शहरात सर्व राजकीय पक्ष व संघटना यांच्याकडून झालेला पहिला सन्मान हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्याचे कामगार, पर्यावरण, मदत व पुर्नवसन, भूकंप पुर्नवसन राज्यमंत्री यांनी मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

राज्याच्या मंत्रीमंडळात मावळ तालुक्याला संधी मिळावी हे प्रत्येक मावळवासीयांचे स्वप्न होते तब्बल 31 वर्षानंतर आमदार बाळा भेगडे यांच्या रुपाने ते स्वप्न आज पूर्ण झाले. मंत्रीपद‍ाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच मावळच्या भूमित आलेल्या नामदार बाळा भेगडे यांच्या हस्ते खंडाळा घाटाची रक्षणकर्ती व जागृत देवस्थान असलेल्या वाघजाई देवीच्या मंदिरात सकाळी अभिषेक करण्यात आला. यानंतर लोणावळा शहरात ढोल ताशे व फटाक्यांची आताषबाजी करत भेगडे यांचे स्वागत केले. खंडाळा ते लोणावळा अशी भव्य रॅली काढत भाजी मार्केट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वप्रथम नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, नगरसेवक बाळासाहेब जाधव, भाजपा गटनेते देविदास कडू, काँग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, पुजा गायकवाड आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  यानंतर भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आय, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, मनसे, भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटना व संस्थ‍च्या वतीने राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे, विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकिर, पुणे जिल्हा भाजपाचे कार्याध्यक्ष गणेश भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, प्रमोद गायकवाड, दत्तात्रय गवळी, माऊली शिंदे, एकनाथ टिळे,  बाळासाहेब घोटकुले, जिल्हा परिषद सदस्य नितिन मराठे, संदीप काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळा भेगडे म्हणाले मावळवासीयांचे स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभले आहे, आज मावळ तालुका खर्‍या अर्थाने मंत्रीमय झाला आहे. मावळ तालुक्यांच्या सर्वांगिन विकासाकरिता मी कटिबद्ध असून पूर्वीपेक्षा जास्त विकास करत मावळ तालुक्याला राज्यातील विकासाचे रोड माॅडल बनविण्याचा माझा मानस आहे. जनसंघ ते भाजपा या वाटचालीत मावळ तालुक्याचे मोठे योगदान असून याकरिता अहोरात्र झटलेल्या तालुक्यातील सर्व दिवंगत ज्येष्ठ नेत्यांना मी मंत्रीपद समर्पित करतो तसेच पवना गोळीबार प्रकरणात शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना नमन करतो, असे सांगत मावळ तालुका हे माझं कुटुंब असल्याने माझ्यावर पक्षाचे मुख्यमंत्री व ज्येष्ठ सहकारी यांनी सोपावलेली जबाबदारी यथाशक्ती पूर्ण करत मावळचा ठसा राज्यभर उमठविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.