Madhuri tributes to Saroj khan: ‘एक दो तीन’ पासून सुरु झालेली ‘धक धक’ आता थांबली…

Madhuri Dixit Tributes to Choreographer Saroj khan सरोज खान यांनी माधुरीच्या चित्रपटांमधील अनेक गाणी कोरिओग्राफ केली. त्यामध्ये ‘तेजाब’, ‘बेटा’, ‘सैलाब’, ‘देवदास’, ‘कलंक’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

एमपीसी न्यूज- सध्या चित्रपटसृष्टीला एकामागून एक धक्के बसत आहेत. मागील दोन महिन्यात आपण अनेक गुणी कलाकार गमावले. त्यातील एक नाव म्हणजे सरोज खान. गुरुवारी रात्री सरोजखान यांचे निधन झाले. शून्यातून विश्व निर्माण करणारी नृत्यदिग्दर्शिका असा सरोजखान यांचा लौकिक होता. त्यांच्या नसानसात नृत्य होते. त्याचबरोबर त्या उत्तम नृत्यदिग्दर्शिका होत्या. धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि सरोजखान हे एक भन्नाट कॉम्बिनेशन होते.

माधुरीला बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करुन देण्याचे काम तेजाब मधील ‘एक दो तीन’…या गाण्याने केले. त्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक सरोजखान यांचे होते. त्यानंतर माधुरी, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री यांच्यापासून सरोज यांनी ज्या ज्या अभिनेत्रींना पडद्यावर नाचवले त्यांची यादी अगदी आजच्या आलिया, कतरिना, कंगनापर्यंत येऊन पोहोचते.

माधुरी आणि सरोज खान यांच्यामध्ये एक वेगळच नाते होते. सरोज खान यांनी माधुरीला बॉलिवूड डान्स शिकवला होता. माधुरीने ‘पीटीआय’शी बोलताना ‘सरोज खान यांना माझी समस्या माहीत होती.


मी एक क्लासिकल डान्सर होते. मी कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे मला बॉलिवूड डान्स फारसा येत नव्हता. सरोज यांनी मला बॉलिवूड डान्स शिकण्याचा सल्ला दिला होता. मी बॉलिवूड डान्सिंग त्यांच्याकडूनच शिकले’ असे म्हटले.

तसेच माधुरीने ट्विट करत सरोज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझी चांगली मैत्रीण आणि गुरु सरोज खान यांच्या जाण्याने मला धक्काच बसला आहे. मला सतत त्यांची आठवण येईल’ असे म्हणत तिने ट्विटमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे.

सरोज खान यांनी माधुरीच्या चित्रपटांमधील अनेक गाणी कोरिओग्राफ केली. त्यामध्ये ‘तेजाब’, ‘बेटा’, ‘सैलाब’, ‘देवदास’, ‘कलंक’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

१९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली. तसेच सरोज खान यांना आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आले आहे.

तसेच मिस्टर इंडिया, चांदनी, नगिना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.