Magalvedha News : मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज – पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. भगीरथ हे दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.

पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

भगीरथ भारत भालके हे पंढरपूर मतदारसंघातून नक्की विजय होतील असा विश्वास व्यक्त करतानाच भगीरथ भालके यांना जयंत पाटील यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

दरम्यान, भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाल्यापासून ही विधानसभेसाठीची पहिली पोटनिवडणूक असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.