Pune News : साप चावलेल्या व्यक्तीवर अघोरी उपचार करणारा मांत्रिक जेरबंद

एमपीसी न्यूज : साप चावल्यानंतर एका व्यक्तीला दवाखान्यात दाखल करण्याचे सोडून त्याच्यावर अघोरी उपचार करणार्‍या एका मांत्रिकाला रांजणगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात वेळीच दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. जयवंत शिंदे असे अटक करण्यात आलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा या ठिकाणी एका ऊसतोड मजुराला विषारी साप चावला होता. व्यक्तीवर दवाखान्यात उपचार न करता एक मांत्रिक अघोरी उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समवेत घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना ऊसतोड मजूर अंकुश बंडू वाघ त्यांच्यावर अघोरी उपचार सुरू असल्याचे दिसले.
पोलिसांनी या ठिकाणाहून कथित मांत्रिक जयवंत श्रीपती शिंदे याला ताब्यात घेतले. ऊसतोड मजुर अंकुश वाघ याची या ठिकाणाहून सुटका करत त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वेळेत औषधोपचार मिळाल्यामुळे अंकुश वाघ यांचे प्राण वाचले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.