Mahad Building Collapse : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 4 वर्षाच्या चिमुकल्याला 18 तासानंतर बाहेर काढण्यात यश

तब्बल 18 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या चिमुरड्याचे नाव मोहम्मद मोहसीन बांगी असे आहे.

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली अडकलेलया नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे 18 तास या ढिगा-या खाली अडकून पडलेल्या 4 वर्षाच्या एका चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात ‘एनडीआरएफ’च्या टिमला यश आले आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’, याची प्रचिती यानिमित्ताने याठिकाणी आली.

तब्बल 18 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या चिमुरड्याचे नाव मोहम्मद मोहसीन बांगी असे आहे. मोहम्मदच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. या इमारतीत मोहम्मद याच्यासह त्याच्या दोन बहिणी आणि आई राहत होती.

त्याचे वडील दुबई येथे कामाला असल्याची माहिती मोहम्मदच्या आत्याने एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना दिली. सध्या एनडीआरएफचे जवान मोहम्मदची आई आणि दोन बहिणींचा शोध घेत आहेत.

मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढल्यानंतर सगळ्यांचाच चेहरा आनंदाने उजळून निघाला.

यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवाय ‘गणपती बाप्पा मोरया’,च्या घोषणाही देण्यात आल्या. तब्बल 18 तास मोहम्मदने आपल्यावर ओढावलेल्या परिस्थितीशी झुंज दिली. शेवटी तो या संकटातून बाहेर पडला.

एनडीआरएफच्या जवानांना दोन पिलरमध्ये एक पाय हलताना दिसला. एका जवानाने त्या पायाला अलगद स्पर्श करत त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोहम्मदनेही त्यांना प्रतिसाद दिला आणि काही क्षणातच एनडीआरएफच्या जवानांनी तो पिलर कटरच्या साह्याने तोडून चिमुकल्या मोहम्मदला या ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढले.

दरम्यान, सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते.

या इमारतीत एकूण 94 रहिवासी राहत होते. त्यापैकी 75 जण सुरक्षित असून अजूनही काही जण अडकले आहेत. या इमारतीतील आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.