Mahad Building Collapsed: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांचा श्वान पथक, लाइफ डिटेक्टरद्वारे शोध सुरु

महाड शहरातील काजलपुरा परिसरात तारिक गार्डन नावाची इमारत होती. दहा वर्ष जुनी इमारत असून यामध्ये 50 सदनिका होत्या. त्यामध्ये सुमारे 250 नागरिक राहत होते.

एमपीसी न्यूज – महाड येथे सोमवारी सायंकाळी पाच मजली इमारत कोसळली. त्यामध्ये शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या श्वान पथक आणि लाइफ डिटेक्टरच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे. बचावकार्यात काही अडथळे येत असून त्यावर मार्ग काढून बचावकार्य अथकपणे सुरु आहे.

महाड शहरातील काजलपुरा परिसरात तारिक गार्डन नावाची इमारत होती. दहा वर्ष जुनी इमारत असून यामध्ये 50 सदनिका होत्या. त्यामध्ये सुमारे 250 नागरिक राहत होते.

घटना घडल्यानंतर तळेगाव दाभाडे येथून एनडीआरएफच्या तीन टीम घटनास्थळी तत्काळ रवाना झाल्या. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी प्रशासनाने ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था केली होती.

या घटनेत मेडिकल कॅम्पसाठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माणगाव, पेण, तळा, पोलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, रुग्णवाहिका, जनरेटर, जेसीबी, डंपर, डॉक्टर्स, पोकलेन, पाणी, बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर तत्काळ पाठविण्यात आली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे. त्यानुसार सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावार यांच्याकडून आज (दि.25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सोमवारी रात्री एनडीआरएफचे श्वान पथक आणि लाईफ डिटेक्टर देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याद्वारे शोधमोहीम सुरु आहे. सोमवारी रात्री सुमारे 15 ते 20 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत एकाचाही शोध लागला नसल्याची माहिती एनडीआरएफ कडून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.