Mahad Building Collapsed: महाड दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

Mahad Building Collapsed: Two killed in Mahad building collapsed, fir filed against 5 people

एमपीसी न्यूज- रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजलपुरा परिसरातील तारिक गार्डन ही 5 मजली इमारत सोमवारी (दि.25) सायंकाळी 6.15 वाजता कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. इमारतीत राहणाऱ्या 95 जणांपैकी 75 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी 18 ते 19 जण अडकल्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित आहेत. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती रायगडचे पोलीस उपअधीक्षक शशीकिरण यांनी सांगितली आहे.


10 वर्षे जुन्या आणि 50 फ्लॅट असलेल्या या इमारतीत 200 ते 250 जण राहत होते. अग्निशमन, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. पालकमंत्री अदिती तटकरेंनी घटनास्थळी भेट दिली. इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट व काँट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील देहू गावाजवळ असलेल्या सदुंबरे येथे एनडीआरएफचे बेस कॅम्प आहे. महाड येथील दुर्घटना झाल्याचे समजल्यानंतर येथून एनडीआरएफची 3 पथके त्वरीत रवाना झाली. या पथकांना वेळेत दुर्घटनास्थळी पोहोचता यावे यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.


दरम्यान, ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता अचानक पत्त्यांसारखी कोसळली. यानंतर मोठ्या आवाजासह धुळीचे लोट आकाशात उडाले. इमारत कोसळल्याचे लक्षात येताच एकाच हाहाकार उडाला. स्थानिकांनुसार, निकृष्ट बांधकामामुळे या इमारतीचा पाया खचलेला होता. मात्र, त्याला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.