Pimpri : महादजी शिंदे हे महान संत-सेनानी-पांडुरंग बलकवडे

एमपीसी न्यूज – रणधूरंधर मराठा सुभेदार राणोजी शिंदे यांना सहा सुपुत्र होते. मराठ्यांच्या इतिहासात शिंदे, युद्ध आणि हौतात्म्य हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. त्याप्रमाणे राणोजींचे पुत्र-पौत्र हे धारातीर्थी पडले. छत्रपती शिवरायांचे आसेतु हिमाचलपर्यंत राज्याचे स्वप्न साकार करताना मराठा सरदारांमध्ये शिंदे घराण्याचे खूप मोठे योगदान आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी केले.

मराठा सेनानी महादजी शिंदे-सरकार यांच्या २२६व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून श्री शिवशंभू जागर समिती, अखिल शिवजयंती उत्सव समिती आणि समस्त ग्रामस्थ पिंपरी आयोजित ‘महान सेनानी महादजी शिंदे-सरकार यांचे भारताच्या इतिहासातील योगदान’ या विषयावर पांडुरंग बलकवडे बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांची हार झाली परंतू जिंकूनही अब्दालीचे अपरिमित नुकसान झाले. या युद्धानंतर हिंदुस्थानात मराठ्यांचा झेंडा पुन्हा फडकवण्यात आणि उत्तरेत गेलेली पत सावरण्यात महादजी शिंदे यांनी अतुलनीय पराक्रमाची शर्थ करून शहाआलम बादशहाला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले; आणि पानिपतचा पुरेपूर सूड उगवला. इ.स. १७५७ मध्ये इंग्रजांच्या रूपाने मराठ्यांना नवा शत्रू मिळाला; परंतु महादजी शिंदे यांनी गनिमी कावा, आधुनिक युद्धनीती याच्या जोरावर ०९ जानेवारी १७७९ रोजी इंग्रजांचा सर्वात दारुण आणि नामुष्कीचा पराभव करून नवा इतिहास निर्माण केला.

महादजी शिंदे यांना पंढरपूरच्या विठ्ठलभक्तीची ओढ होती तर मलप्पा वासकर यांच्याकडून महादजींनी वारकरी संप्रदायाचा वसा घेतला. पानिपतच्या रणसंग्रामात एका पायाने अपंग झालेले, उतारवयात अनेक शारीरिक व्याधी असल्यातरी समाधानी वृत्तीचे महादजी शिंदे यांचे १२ फेब्रुवारी १७९४ रोजी देहावसान झाले. एक झुंजार सेनानी आणि संतपुरुष ही त्यांची ओळख इतिहासात कायम राहील असे मत पांडुरंग बलकवडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

पिंपरीगाव येथे रविवार (दि.२३) पार पडलेल्या या कार्यक्रमाला वानवडी येथील अपंग कल्याण संस्थाचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे अध्यक्षस्थानी तर सद्गुरुनाथ माउलीमहाराज वाळुंजकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित वाघेरे यांनी केले तर मंदार नाणेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.