Mahajobs Portal : ‘महाजॉब्स’वर 4 तासांत 13 हजार उमेदवार व 147 उद्योगांचीही नोंदणी

Mahajobs Portal: Dedication of 'Mahajobs' website, registration of 13,000 candidates and 147 industries in 4 hours मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘महाजॉब्स’ या संकेतस्थळाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘महाजॉब्स’ या संकेतस्थळाचे लोकार्पण केले.लोकार्पणाच्या पहिल्या चार तासातच या संकेतस्थळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून चार तासात 13 हजार नोकरी इच्छुकांची तर 147 उद्योगांचीही नोंदणी झाली आहे. 

संकेतस्थळ लोकार्पण प्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे आदि सहभागी झाले होते.

देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी  काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखविले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे नमूद केले तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.

या महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी 17 क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील 950 व्यवसायांसाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याबरोबच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे.  http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तरूणांना आणि उद्योजकांना नोंदणी करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.