Pune News : ‘त्या’ ट्रायल रनवर महामेट्रोचा खुलासा, म्हणाले आम्ही तर शरद पवार यांना…

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी पिंपरी चिंचवड परिसरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे पाहणी केली आणि फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिका मेट्रोने प्रवासही केला. त्यांच्या या मेट्रो प्रवास करून मोठे वादंग निर्माण झाले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.

स्थानिक नेते प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? हा तर आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असल्याचा सांगत चंद्रकांत पाटलांनी टीका केली होती. तसेच महा मेट्रो विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

त्यावर आता पुणे महामेट्रोकडून खुलासा देण्यात आला. महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, या मार्गावरील मेट्रोची चाचणी 2019 साली पार पडली आहे. शरद पवार यांना केवळ या प्रकल्पाची माहिती पाहिजे होती. मेट्रो प्रकल्प सुरू होऊन साडेचार वर्ष झाले परंतु ते याठिकाणी आले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना या प्रकल्पाची माहिती दिली आणि त्यांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिका प्रवास केला. त्यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन वगैरे झाली नसल्याचे हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांना मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल उपस्थित केला. पुणे पिंपरीतल्या आमदार-खासदारांना न कळवता शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल केली गेली परंतु अशा प्रकारे घाईत ट्रायल घेण्याचं कारण काय? त्यातून श्रेयवादाची लढाई चालली काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.