Mumbai : ‘महापरवाना’ घेऊन उद्योग सुरू करता येणार, गुंतवणूक वाढविण्यासाठी उद्योग विभागाचे ‘महाप्लॅनिंग’

Mahaplanning to bring in more investment to start new industries in the state announces Minister for industry Subhash Desai

एमपीसी न्यूज – नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसी औद्योगिक शेड उभे करून देणार आहे. विविध परवान्यांऐवजी ‘महापरवाना’ घेऊन उद्योग सुरू करता येईल. याशिवाय एमआयडीसीबाहेरील जमीन अधिग्रहित करून उद्योग सुरू करण्यास चालना दिली जाईल अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज (शुक्रवारी) एका वेबीनार दरम्यान दिली.

ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वतीने आयोजित वेबिनारदरम्यान बोलताना देसाई म्हणाले, विदेशी गुंतवणुकदारांसाठी एमआयडीसीने राज्याच्या विविध भागांत सुमारे 40 हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे.

यामध्ये पाणी, वीज, रस्ते आदी पायाभूत सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. गुंतवणूक करार केल्यानंतर थेट उत्पादन सुरू करण्यासाठी एमआयडीसी स्वखर्चाने औद्योगिक शेड उभे करणार आहेत. या ठिकाणी ‘प्ले अँड प्लग’द्वारे थेट उद्योग सुरू करता येईल असे ते म्हणाले.

राज्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने खुले धोरण स्वीकारले असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाणार असून, उद्योग सुरू झाल्यांतर पुढील एक दोन वर्षांत इतर विभागांचे परवाने घेण्याची मुभा उद्योजकांना राहणार आहे.

मनुष्यबळाची टंचाई भासू नये यासाठी कामगार ब्युरोची स्थापना देखील करण्यात येणार आहे. याद्वारे उद्योगांना लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ अवघ्या सात दिवसांत पुरविण्याचे नियोजन उद्योग विभागाने केले आहे.

संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणूकदारांना फायदा घ्यावा असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.