Maharashtra Band : लखीमपूर हिंसाचार निषेधार्थ 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’, राज्य सरकारची घोषणा

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. यानुसार 11 ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पाळला जाणार आहे.

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. सोमवारपासून काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते लखीमपूर खेरी येथे जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उत्तर प्रदेश सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना तिथे जाऊ देत नाहीत.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी लखीमपूरला गेले आहेत. यावेळी राहुल गांधींसोबत पंजाब आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री होते. या दोन्ही राज्यांनी मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशने लखीमपूरमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 45 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा सोमवारी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.