Maharashtra Cabinate 2023 : राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वपूर्ण 15 निर्णय

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (Maharashtra Cabinate 2023) आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय पुढील प्रमाणे – 

  1. महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत… ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येत आहे.
  2. खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू करणार.
  3. राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर 12 नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय.
  4. महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 50 व्या बैठकीतील शिफारशीनुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यास मान्यता. आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार.
  5. सन 2022 च्या तेंदू हंगामापासून पुढे तेंदू पाने संकलनाद्वारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजाती न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मंजूरी म्हणून देणार.
  6. महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 या विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता. परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होणार. यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणार.
  7. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टी.सी.एस., आयओएन व आय.बी.पी.एस. या कंपन्यांकडून घेताना उमेदवारांकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क निश्चित.
  8. राज्यात दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ. गाईसाठी 70 हजार रुपये, म्हशीसाठी 80 हजार रुपये.
  9. फलटण-पंढरपूर या नवीन (Maharashtra Cabinate) ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता. परिसरातील रेल्वे जाळे सक्षम होणार.
  10. महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत परिपोषण अनुदानात 1 हजार 225 वरुन 2500 रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय.
  11. पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास 3976 कोटी 83 लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अवर्षण प्रवण भागात 10 हजार 970 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.
  12. पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस 460 कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे पुणे जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील 63 गावात 25 हजार 498 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार.
  13. नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या वापर प्रयोजनाविषयी निर्णय. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था देखील येणार. 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व 1 लाख रोजगाराची निर्मिती.
  14. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. ही योजना केवळ जिल्हास्तरावरुन अथवा राज्यस्तरावरुन न राबविता सामाजिक न्याय विभागाच्या “अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना पूर्वीची दलित वस्ती सुधार योजना” व “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर राबविण्यात येणार.
  15. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. अग्निसुरक्षा विषयक तरतुदींच्या अनुषंगाने सुधारणा. शैक्षणिक इमारतींची उंची 30 मीटर वरुन 45 मीटर करणे, फायर ऑडिटर/ सल्लागार नेमणूकीची तरतूद.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.