Maharashtra-China Corona: चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 83 हजार तर महाराष्ट्रात 85 हजारच्या पुढे!

Maharashtra-China Corona: Worrying! Maharashtra now ahead of China in number of corona patients! कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्राने चीनला मागे टाकले असले तरी कोरोना बळींच्या संख्येत मात्र चीन महाराष्ट्राच्या बराच पुढे आहे.

एमपीसी न्यूज – कोविड-19 चा पहिला विषाणू आढळलेल्या चीनमध्ये सुरूवातीच्या काळात कोविड-19 चा मोठा प्रकोप झाला आणि सर्वात आधी मोठा नरसंहार देखील झाला. त्या चीनला महाराष्ट्राने कोरोना संसर्गात आज (रविवारी) मागे टाकले आहे. चीनमध्ये 83 हजार 36 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. महाराष्ट्रात आजपर्यंत 85 हजार 975 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

चीनमधील वुहान शहरात डिसेंबर महिन्यात कोविड-19 हा विषाणू आढळला आणि जानेवारी महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा मोठा प्रकोप झाला. त्यानंतर चीनने कोरोनावर नियंत्रण मिळविले, मात्र कोरोनाचा संसर्ग जगभर पसरला. जगातील 70 लाखांपेक्षा अधिक लोकांना या विषाणूची बाधा झाली. जागतिक क्रमवारीत आता चीन 18 व्या क्रमांकावर आहे. तर भारत सहाव्या स्थानावर आहे.

चीनमध्ये एकूण 83 हजार 36 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 968 पर्यंत पोहचली आहे.  म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या काल चीनपेक्षा केवळ 68 ने कमी होती. म्हणजेच महाराष्ट्राने चीनमधील कोरोनाबाधितांच्या संख्येशी जवळजवळ बरोबरी केली होती. राज्यात आज 3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्र आज कोरोनाबाधितांच्या संख्येत चीनला मागे टाकून पुढे गेला आहे.

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 46 हजार 628 आहे. त्यापैकी 85 हजार 975 कोरोनाबाधित महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच भारतातील जवळजवळ 34 टक्के कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात आहेत. सध्या दररोज महाराष्ट्रात गेले कित्येक दिवस दररोज अडीच ते तीन हजारांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत सुरूवातीला प्रथम क्रमांकावर असणारा चीन आता 18 व्या स्थानावर गेला आहे. चीनकडून कोरोना संदर्भातील माहिती लपविण्यात येत असल्याचा आरोप जगभर करण्यात येत आहे. त्याबाबत चौकशीची मागणी अमेरिकेसह विविध राष्ट्रांनी केली आहे. तथापि, चीनची कोरोना संसर्गाबाबतची उपलब्ध आकडेवारी पाहता महाराष्ट्राने चीनला याबाबतीत मागे टाकले आहे, असेच म्हणावे लागेल.

चीनमध्ये एकूण 4 हजार 634 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तर महाराष्ट्रात 3 हजार 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र चीनच्या पुढे गेला असला तरी मृतांची संख्या मर्यादित ठेवण्यात मात्र महाराष्ट्राला यश आल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनसारख्या उपाययोजना केल्यामुळे महाराष्ट्राला चीनची बरोबरी करण्यास जवळपास पाच महिने अधिक कालावधी लागला आहे, ही वस्तुस्थिती देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 975 असली तरी त्यापैकी 39 हजार 314 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही 43 हजार 591 सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. चीनमधील 83 हजार 36 पैकी 78,332 रुग्ण बरे झाले असून आता केवळ 70 सक्रिय रुग्ण चीनमध्ये शिल्लक आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत चीनला मागे टाकणारा महाराष्ट्र कोरोना नियंत्रण आणि कोरोनामुक्तांच्या संख्येत चीनला कधी मागे टाकणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.