Maharashtra CM Uddhav Thackeray : राज्यातील जनतेवर माझा विश्वास – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – राज्यातील जनतेवर माझा विश्वास आहे, तुम्ही या युद्धातील सैनिक आहात. अनावश्यक कारणामुळे बाहेर पडू नका. जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलात तर चित्र वेगळं असेल. पण, सद्यस्थिती कायम राहिली तर 15, 20 दिवसांत रुग्णालयं तुडूंब भरतील. स्वयंशिस्तीनेच कोरोनाला हरवणं शक्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना सांगितले.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत अनेक गोष्टींचे खुलासे केले.

परिस्थिती हाताबाहेर गेली तर, ब्राझीलसारखं चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. रोजगार परत मिळेल. पण, गेलेला जीव परत मिळणार नाही. मला वेगळा उपाय हवा. लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य असलं तरी संसर्गाची साखळी तोडायची कशी, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेत येत्या एक-दोन दिवसांत कडक निर्बंध लागू करणार असल्याचे सांगत त्याबाबत कार्यालयांनाही सुचनावली दिली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

याबरोबरच पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन झालं, तर रस्त्यावर उतरा असं सांगणाऱ्या अनेकांनाच मी सांगतो की गरजूंची मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा, आरोग्य सेवकांना मदतीचा हात देण्यासाठी रस्त्यावर उतरा. कोरोनाविरोधातच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतराच असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना, लॉकडाऊन परिस्थितीच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणाऱ्या पक्षांना, आरोग्य सुविधा वाढवण्याचा सल्ला देणाऱ्या उद्योगपतींनाही वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना नाव न घेता फैलावरही धरलं.

आतापर्यंत 65 लाख नागरिकांना लसीकरण केलं असून, एका दिवसाला 3 लाख नागरिकांना लस दिली आहे. ही संख्या 6-7 लाखांवर नेण्याचं लक्ष्य आहे. लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होणार नाही असं नाही, फक्त त्याच्या धोक्याचं प्रमाण हे कमी झालेलं असेल. लस घेणं, चाचण्या वाढवणं हा अद्यापही उपाय नाही. चाचण्यांमुळे रुग्णसंख्या कळत आहे. रुग्णवाढ थांबवण्यासाठीचा उपाय मात्र अजूनही मिळालेला नाही याची खंतही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.