Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,515 नवे रुग्ण, 35 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 2 हजार 515 कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाली असून, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिवसभरात 2 हजार 554 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात 34 हजार 640 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज झालेल्या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 48 हजार 802 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 61 हजार 525 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 35 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 360 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.51 टक्के एवढा आहे.

राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.74 टक्के एवढा झाला आहे. आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 50 लाख 58 हजार 995 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 20 लाख 48 हजार 802 नमूने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 67 हजार 694 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1 हजार 805 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. पथकाने ज्या भागातील पॉझीव्हीटी दर जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे त्याची दखल घेऊन तेथील हा दर कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित करू असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

याभागातील रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी करण्यात येईल, त्याचबरोबर ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्रात 24 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागात जास्त रुग्णसंख्या असून याभागातील नविन रुग्णांची संख्या घटत असल्याचे पथकाने सांगितले.

विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत अमरावती, अकोला, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यात पॉझीटिव्हीटी दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.