Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,524 नवे रुग्ण, 59 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज, शुक्रवारी दिवसभरात 3 हजार 524 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 35 हजार 636 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 4 हजार 279 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 18 लाख 32 हजार 825 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्यात आजघडीला 52 हजार 084 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 59 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर राज्यात 49 हजार 580 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर सध्या 2.56 टक्के एवढा आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 28 लाख 23 हजार 8340 नमून्यांपैकी 19 लाख 35 हजार 6360 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 69 हजार 348 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 314 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दोन जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.