Maharashtra Corona Update: एकाच दिवशी 5071 रुग्णांना डिस्चार्ज, 56 हजारांहून अधिक कोरोनामुक्त – राजेश टोपे

Maharashtra Corona Update: 5071 patients discharged on the same day, more than 56 thousand corona free - Rajesh Tope राज्यात आज कोरोनाच्या 2786 नव्या रुग्णांची भर पडली तर 178 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

एमपीसी न्यूज – राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात 5 हजार 71 रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधिक 4242 एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 50.61 टक्के झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 2786 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1 लाख 10 हजार 744 अशी झाली आहे. राज्यात एकूण 50 हजार 554 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज 178 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा 4,128 झाला आहे. राज्याने कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

दि. 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे 15 दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

आज सोडण्यात आलेल्या 5071 रुग्णांमध्ये मुंबई मंडळात 4242 (आतापर्यंत एकूण 39 हजार 976) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात 568 (आतापर्यंत एकूण 8430), नाशिक मंडळात 100 (आतापर्यंत एकूण 2365), औरंगाबाद मंडळ 75 (आतापर्यंत एकूण 1945), कोल्हापूर मंडळ 24 (आतापर्यंत एकूण 1030), लातूर मंडळ 11 (आतापर्यंत एकूण 444), अकोला मंडळ 22 (आतापर्यंत एकूण 1048), नागपूर मंडळ 29 (आतापर्यंत एकूण 811) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.