Maharashtra Corona Update: राज्यातील 85 टक्के रुग्णांनी केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – राज्यात आज 10 हजार 226 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर 13 हजार 714 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 13 लाख 30 हजार 483 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.04% झाले आहे.

राज्यात एकूण 1 लाख 92 हजार 459 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात मागील तीन दिवस नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीच्या जवळपास होती. आजही बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे पण त्याचे प्रमाण मागील तीन दिवसांपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

नवीन रुग्णांपेक्षा बऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे.

कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

कोरोना साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचाच हा प्रातिनिधिक सत्कार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

फिजीकल डिस्टसींग आणि सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे.कोरोनाच्या लढाईमध्ये आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांनी जोरदार लढाई लढली असून राज्यामध्ये बऱ्याच अंशी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यानिक अधिकारी, सफाई कामगार, आशा कार्यकर्ती, कक्षसेवक, भट्टीचालक, क्ष-किरण अधिकारी, परिसेविका अशा सुमारे 40 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, अवर सचिव अर्चना वालझाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.