एमपीसी न्यूज – राज्यात आजही विक्रमी रुग्ण कोरोनामुक्त झाले. आज 10 हजार 333 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 717 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 3 लाख 91 हजार 440 एवढी झाली आहे. त्यापैकी, 1 लाख 44 हजार 694 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 2 लाख 32 हजार 277 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आज 282 रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. यांसह राज्यातील मृतांचा आकडा 14 हजार 165 वर जाऊन पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.62 टक्के एवढा आहे. आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.34  टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 19 लाख 68 हजार 559 नमुन्यांपैकी 3 लाख 91 हजार 440 नमुने पॉझिटिव्ह  आले आहेत. राज्यात 8 लाख 85 हजार 548 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 42 हजार 733 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, भारताच्या कोरोना मृत्यु दरात आणखी घट झाली आहे. जूनच्या मध्यावर 3.33 टक्के असलेला हा मृत्यदर आज 2.25 टक्के  इतका झाला आहे.

जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्यूदर असणाऱ्या देशांमध्ये असलेले स्थान भारताने कायम  राहिले आहे. प्रतिबंधात्मक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी,  घरोघरी जाऊन सर्वेक्षण, अधिकाधिक कोविड चाचण्या, सर्वांगीण वैद्यकीय उपचार सेवेवर आधारित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली, रुग्णालय यंत्रणांवरचा ताण कमी करण्यासाठी लक्षणविरहीत रुग्णांसाठी वैद्यकीय देखरेखेखाली गृह अलगीकरण या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणून मृत्यूदर सतत कमी होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.