Maharashtra Corona Update : दिलासादायक ! आज दिवसभरात उच्चांकी 32,007 रुग्णांना डिस्चार्ज, 15,738 नव्या बाधितांची वाढ

आतापर्यंत 33 हजार 015 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात आजवरच्या सर्वाधिक 32 हजार 007 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्याने 15 हजार 738 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 344 बाधितांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून दररोज वीस हजारांहून अधिक रुग्णांची वाढ होत असताना आज बाधित रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे.

आरोग्य विभागाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 12 लाख 24 हजार 380 एवढी झाली आहे.

त्यापैकी 9 लाख 16 हजार 348 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या 2 लाख 74 हजार 623 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 344 बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 33 हजार 015 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट 74.84 एवढा झाला आहे तर मृत्यूदर 2.7 टक्के एवढा आहे. आजवर तपासण्यात आलेल्या 59 लाख 12 हजार 258 चाचण्या पैकी 12 लाख 24 हजार 380 (20.71%) चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. राज्यात सध्या 18 लाख 58 हजार 924 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 35 हजार 517 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाला सर्वांचा प्रतिसाद महत्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले. बाणेर येथील युतिका सोसायटीमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.