Maharashtra Corona Update: नवा उच्चांक ! राज्यात दिवसभरात 23,350 नवे रुग्ण, 328 मृत्यू

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 लाख 07 हजार 212 एवढी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 44 हजार 400 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात आजवरची सर्वाधिक 23 हजार 350 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली तर, 328 रुग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आजच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 लाख 07 हजार 212 एवढी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 44 हजार 400 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 2 लाख 35 हजार 857 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात 328 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 26 हजार 604 कोरोना रुग्ण दगावले आहेत. आज 7 हजार 826 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80 टक्के व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील.

यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60 टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50 टक्के या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा. आता मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करून पुरवठ्याचे प्रमाण 80 टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठी तर 20 टक्के उद्योगांसाठी असे करण्यात आले. यामुळे रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.