Maharashtra Corona Update : 53.78 लाख रुग्णांपैकी 48.26 लाख कोरोनामुक्त, 89.74 टक्के रिकव्हरी रेट

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र असून, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. राज्यातील एकूण 53.78 लाख रुग्णांपैकी 48.26 लाख उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 89.74 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज (रविवारी, दि.16) दिवसभरात 34 हजार 389 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर, 59 हजार 318 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. चिंताजनक बाब म्हणजे मृतांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. आज राज्यात 974 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होत असून, सध्या राज्यात 4 लाख 68 हजार 109 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या आहे. पुण्यात 82 हजार 397 सक्रिय रुग्ण आहेत तर, मुंबईत 33 हजार 574, नागपूर मध्ये 32 हजार 223 तर, ठाण्यात 30 हजार 492 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजवर महाराष्ट्रात 81 हजार 486 जण कोरोनामुळे मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.51 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 34 लाख 91 हजार 981 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 28 हजार 398 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 11 लाख 03 हजार 991 नमूने तपासण्यात आले असून, राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.29 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.