Maharashtra Corona Update: राज्यात आज सर्वाधिक 26 हजार 408 रुग्ण झाले बरे

एमपीसी न्यूज – राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी 26 हजार 400 एवढ्या उच्चांकी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज 20 हजार 598 नवीन रुग्णांचे निदान झाले. 

राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 84 हजार 341 वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या 2 लाख 91 हजार 238 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज 455 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 58 लाख 72 हजार 241 नमुन्यांपैकी 12 लाख 8 हजार 642 नमुने पॉझिटिव्ह (20.58 टक्के) आले आहेत. राज्यात 18 लाख 49 हजार 217 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 644 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 455 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.7 टक्के एवढा आहे.

जालन्याच्या 107 वर्षीय आजीबाईंच्या पाठोपाठ आज कल्याण येथे 106 वर्षांच्या आजीबाईही कोरोनाला हरवत ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील जम्बो रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झालेल्या आजीबाई रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत हसतमुख चेहऱ्याने घरी परतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.