Maharashtra Corona Update : आज बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

13,408 जणांना डिस्चार्ज तर 12,712 नवे रुग्ण : The number of corona-free patients is higher than the number of infected patients today

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 13 हजार 408 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज 12 हजार 712 नवे रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 48 हजार 313 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यातील एकूण 5 लाख 48 हजार 313 कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 लाख 81 हजार 843 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 47 हजार 513 सक्रिय रुग्ण आहेत. आज दिवसभरात 344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर राज्यात 18,650 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असून तो सध्या 69.64 टक्के एवढा आहे. दुसरीकडे मृत्यू दर सुद्धा कमी झाला आहे व सध्या राज्यातील मृत्यूची टक्केवारी 3.4 टक्के आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 29 लाख 08 हजार 884 नमुन्यांपैकी 5 लाख 48 हजार 313 नमुने पॉझिटिव्ह (18.84 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 15 हजार 115 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 880 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत आज 1,132 नवे रुग्ण आढळले तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील तब्बल 1 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईतील 19 हजार 064 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी 300 रुपये कमी करण्यात आले आहेत.

आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 1900, 2200 आणि 2500 रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.