Maharashtra Corona Update : राज्यात आज 19,592 जण कोरोनामुक्त, 17,794 नव्या रुग्णांची वाढ

सध्या 2 लाख 72 हजार 775 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 76.33 टक्के एवढा झाला आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 592 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 17 हजार 794 रुग्णांची वाढ झाली असून 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 13 लाख 757 एवढी झाली असून त्यापैकी एकूण 9 लाख 92 हजार 806 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

सध्या 2 लाख 72 हजार 775 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 76.33 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 419 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.67 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 62 लाख 8 हजार 788 नमुन्यांपैकी 13 लाख 757 नमुने पॉझिटिव्ह ( 20.71 टक्के) आले आहेत. राज्यात 19 लाख 29 हजार 572 लोक होम क्वारंटाईन आहेत. सध्या 32 हजार 747 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले असून 16 स्लाईसच्या चाचणीसाठी 2000, 16 ते 64 स्लाईसच्या चाचणीसाठी 2500 रुपये आणि 64 ते 256 स्लाईसच्या चाचणीसाठी 3000 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय समितीने हे दर निश्चित केले आहेत.

कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे.

यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.