Maharashtra Corona Update : आज 10,216 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 22 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – राज्यात नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 10 हजार 216 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर, 53 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21 लाख 98 हजार 399 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 55 हजार 951 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 6 हजार 467 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52 टक्के झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या राज्यात एकूण 88 हजार 830 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 53 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 52 हजार 393 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.40 टक्के एवढा आहे. राज्यात 4 लाख 10 हजार 110 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 203 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

पुण्यात सर्वाधिक 18 हजार 401 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल नागपूर मध्ये 11 हजार 552, मुंबई 9 हजार 055 तर, ठाण्यात 9 हजार 579 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.