Maharashtra Corona Update: आज 23,644 जण कोरोनामुक्त तर 20,419 नव्या रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. आज दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून 20 हजार 419 नवीन रुग्णांचे निदान झाले. 

राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 16 हजार 450 वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.94 टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 69 हजार 119 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 430 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.66 टक्के एवढा आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 63 लाख 69 हजार 676 नमुन्यांपैकी 13 लाख 21 हजार 176 नमुने पॉझिटिव्ह ( 20.74 टक्के) आले आहेत. राज्यात 19 लाख 45 हजार 758 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 30 हजार 571 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहीम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस असून आपल्या कुटुंब,गाव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आज या क्षणाला आपले राज्य हे एकमेव राज्य आहे की जे या कोरोनामुक्तीच्या कामाला जनचळवळ बनवते आहे; त्याशिवाय आपण कोरोनामुक्त होऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही केवळ प्रासंगिक आपत्ती नसून ती येणाऱ्या काळातल्या मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येणारी आपत्ती व लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावा लागेल असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.