Maharashtra Corona Update : आज 5,753 नवे रुग्ण, राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येत वाढ

0

एमपीसी न्यूज – राज्यात आज नव्याने 5 हजार 753 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या राज्यात 81 हजार 512 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कालच्या तुलनेत आज जवळपास दीड हजाराहून अधिक सक्रिय रुग्णांची वाढ झाली आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाख 80 हजार 208 एवढी झाली आहे. त्यापैकी 16 लाख 51 हजार 064 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सध्या 81 हजार 512 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 46 हजार 623 रुग्ण दगावले आहेत. तसेच, आज 4 हजार 60 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 92.75 टक्के एवढा झाला आहे तर, मृत्यूदर 2.62 टक्के एवढा आहे.

राज्यात एक कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आतापर्यंत तब्बल 1 कोटी 2 लाख 13 हजार 26 नमूने तपासण्यात आले असून, त्यापैकी 17 लाख 80 हजार 208 एवढे नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 15 हजार 976 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 615 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात नव्याने वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या कमी होत होती. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने घटत चालली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III