Maharashtra Corona Update : राज्यात दहा लाख रुग्ण कोरोनामुक्त, आज 23,644 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज 10 लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. राज्यात आज 20 हजार 419 नवीन रुग्णांचे निदान झाले. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 76 टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे.

राज्यभरात सध्या 2 लाख 69 हजार 119 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात पहिला रुग्ण 9 मार्चला आढळून आला होता. त्यानंतर 25 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली.

मात्र, जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले आणि याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा 1 लाखाचा टप्पाही गाठला.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 2 लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांत 3, 4 आणि 5 लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरमध्येही 7,8,9 आणि आज 10 लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 63 लाख 69 हजार 676 नमुन्यांपैकी 13 लाख 21 हजार 176 नमुने पॉझिटिव्ह (20.74 टक्के) आले आहेत.

राज्यात 19 लाख 45 हजार 758 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 30 हजार 571 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज 430 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.66 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.