Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,623 नव्या रुग्णांची वाढ, 51 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शनिवारी दिवसभरात 8 हजार 623 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 51 रुग्णांचा मृत्यू झाला. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. सध्या राज्यात 72 हजार 530 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21 लाख 46 हजार 777 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 20 हजार 951 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 648 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज दिवसभरात राज्यात 51 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 52 हजार 092 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.43 टक्के एवढा आहे तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 टक्के झाले आहे.

राज्यात सध्या 3 लाख 34 हजार 102 जण होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 084 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. पुण्यात सध्या सर्वाधिक 13 हजार 692 सक्रिय रुग्ण आहेत तर मुंबईत 8 हजार 080 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.