Cyclone: महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर 3 जूनला वादळ धडकण्याची शक्यता

Maharashtra, Gujarat coast likely to hit cyclone on June 3

एमपीसी न्यूज- अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 3 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातला वादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

अम्फान चक्रीवादळाने ओदिशा आणि पश्चिम बंगालला तडाखा दिल्यानंतर आता हवामान खात्याने महाराष्ट्र आणि गुजरातला वादळाचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात येत्या 48 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने या दोन राज्यांना 3 जूनपर्यंत वादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात सध्या दोन वादळांची निर्मिती झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यातील एक वादळ आफ्रिकेच्या तटावरुन ओमानमार्गे पुढे येमेनच्या दिशेने सरकणार आहे.

तर दुसरे वादळ भारताच्या दिशेने सरकत आहे. या वादळाचा तडाखा महाराष्ट्र आणि गुजरातला बसण्याची शक्यता आहे. आज या वादळाविषयी आणखी अचूक अंदाज वर्तवला जाईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात 10 दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते व 86 जणांचा बळी गेला होता.

तर मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली होती. तसेच लाखो लोक बेघर झाले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि गुजरात हवामान खात्याने वादळाचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.