Corona Update : देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या 10 पैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात

एमपीसी न्यूज – कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे चिंतेत भर पडत असतानाच यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. महाराष्ट्रातच यामध्ये पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या 10 पैकी नऊ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

नुकतीच यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.

कोरोनासंदर्भात दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय असून जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 28 हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त असल्याचे राजेश भूषण यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला 1700 तर मध्य प्रदेशात 1500 रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्य सचिवांनी दिली. त्यांनी पुढे बोलताना सांगितले सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या 10 जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील असून यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.