Tathawade : महाराष्ट्राची कुस्ती टिकली पाहिजे- संदीप पवार

महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख यांचा सत्कार; ताथवडे ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ११ हजार रुपयांची मदत

एमपीसी  न्यूज –  महाराष्ट्राची संस्कृती असलेला कुस्ती हा क्रीडा प्रकार टिकला पाहिजे. त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न व्‍हायला पाहिजेत, असे मत राष्ट्रवादीचे युवानेते संदीप पवार यांनी व्यक्त केले.

ताथवडे ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्याबद्दल पैलवान बाला रफिक शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप पवार बोलत होते. ग्रामस्थांच्या वतीने शेख यांना १ लाख ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी नृसिंह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पवार, उद्योजक राजाभाऊ पवार, जालिंदर फेंगसे, संतोष रिठे, स्वप्नील भांडवलकर आदी उपस्थित होते.

यावेळी संदीप पवार म्हणाले, बुलढाण्याकडून ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत उतरणारा बाला रफीक हा मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील खडकी गावचा आहे. घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. दोन वेळचा खुराक मिळणेसुद्धा त्याच्यासाठी आव्हानात्मक होते. गेल्या पाच पिढय़ा कुस्तीची परंपरा या शेख कुटुंबीयांनी जोपासली. वडील आझम शेख यांनी मुलांच्या कुस्तीसाठी गांभीर्याने मेहनत घेतली. बाला रफीक हा त्यांचा तिसरा मुलगा. पहिल्या दोन मुलांनीही कुस्तीमध्ये नशीब अजमावून पाहिले. परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मग, शेख कुटुंबीयांनी बाला रफीकच्या खेळाकडे लक्ष केंद्रित केले. शेख कुटुंबियांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे यश आता त्यांना मिळाले आहे. महाराष्ट्राची ओळख असलेली कुस्ती जोपासली जावी म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न व्‍हायला पाहिजेत. त्यासाठी राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे, असेही पवार यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.