Maharashtra Lockdown : लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याची सर्व मंत्र्यांची मागणी ; मुख्यमंत्री अंतिम निर्णय जाहीर करणार

एमपीसी न्यूज – राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र, लॉकडाऊनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लशींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात मागील दोन दिवसांपासून बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली असून चाळीस हजारांच्या आसपास रुग्णवाढ होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 87.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 996 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.