Maharashtra News : पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – एकवेळ मालमत्तेचे नुकसान (Maharashtra News) भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरफ, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवामान खात्याचे, गृह तसेच विविध विभागाचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित अधिकारी तसेच सर्व विभागीय आयुक्तांकडून आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय आपत्ती जोखीम तसेच त्याअनुषंगाने तयारी करण्याबाबत महत्त्वपूर्ण असे निर्देशही दिले.

Mahalunge : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ते म्हणाले की, आपत्ती प्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करावे. प्रतिसाद आणि शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या. यापूर्वीच भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधावा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्यावी.

भूस्खलन, दरडी आणि जमीनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचाली या भागातील नागरिकांना माहित असतात. त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करावी. बहुउद्देशीय सभागृहे, शाळा किंवा तत्सम निवारे उपलब्धता याबाबत तयारी करून ठेवावी.

याठिकाणी आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधांचा साठा याबाबत संबंधित विभागांना आतापासूनच काळजी घ्यावी. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांत आतापासूनच औषधांचा पुरेसा साठा राहील, असे पहावे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीही तयारी ठेवावी. संर्पदंशावरील लसी उपलब्ध राहतील, याची खात्री करावी.

वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरणने सतर्क राहणे आवश्यक आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफशी संपर्क-समन्वय राखावा. हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत सतर्क रहावे. जीवरक्षकांची आवश्यकता भासल्यास त्यांची मानधन तत्वावरही नेमणूक करण्यात यावी.

पावसाळा सुरु होण्यापूर्वीच राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात यावी. पंढरपूरला विशेष निधी दिला आहे. आषाढी वारीपूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी याकडे (Maharashtra News) लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.