Maharashtra News : महाराष्ट्रातील गोल्ड व्हॅल्यूअर्सना योग्य न्याय देण्यासाठी राज्यात “गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन” संस्थेची स्थापना

एमपीसी न्यूज – ग्राहकाच्या सोन्याचे योग्य मुल्यांकन करण्याचे महत्त्वाचे काम करणारा, ग्राहक व बँक यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे गोल्ड व्हॅल्यूअर. राज्यातील अशा सर्व गोल्ड व्हॅल्यूअर्सना त्यांच्या कामाचा योग्य ते मोबदला मिळवून देण्यासाठी व्हॅल्यूअशन क्षेत्रातील दिग्गज एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य पातळीवर सरकार दरबारी नोंदणीकृत अशी “गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन” संस्था स्थापन केली आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, अगदी गाव पातळीवरील सुवर्णकार व सराफ या संस्थेचे सभासद असतील व या असोसिएशनमार्फत व्हॅल्यूअरना न्याय मिळवून देण्याचा मानस तर आहेच, त्याच बरोबर व्हॅल्यूअरना व्हॅल्यूअशन क्षेत्रातील प्रचलित बाबींबाबत अवगत केले जाणार असून व्हॅल्यूअरना आपले कौशल्य अपडेट करण्यास मदत केली जाणार आहे. साहजिकच व्हॅल्यूअर सोबत बँकांना पर्यायाने अंतिम ग्राहकाला या सुसूत्रतेचा फायदा होणार आहे.

पुरातन काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे परंतु आजही भारतीय जनतेचे सोन्याचे वेड काही कमी झालेले नाही. मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो वा श्रीमंत, तो सोने खरेदी करतच असतो. काहीजण हौस म्हणून वा काही गुंतवणुकीच्या दृष्टीने. कारण त्याना कल्पना असते की आपल्या अडचणीच्या वेळी हेच सोने कामाला येणार आहे. अडचणीच्या काळात हे सोने बँकेत, पतसंस्था वा इतर नॉन फायनान्शियल संस्थे मध्ये तारण ठेवून तो पैसे उभे करत असतो. अशा वेळेस गोल्ड व्हॅल्यूअर हा महत्त्वाचा घटक ग्राहक व बँका यांच्या दरम्यान काम करत असतो.

व्हॅल्यूअर हा ग्राहकाच्या सोन्याचे योग्य मुल्यांकन करून देत असतो व त्याच्या मूल्यांकनाच्या जबाबदारीवर बँका व तत्सम संस्था सोने तारण कर्ज देत असतात. परंतु, या गोल्ड व्हॅल्यूअरला त्याच्या जबाबदारी व कामाच्या तुलनेत योग्य तो मोबदला तर मिळतच नाही पण इतर अनेक व्यवसायिक समस्यांना तोंड द्यावे लागते. बँकाना, तत्सम संस्थांना योग्य ते व्हॅल्यूअशन करून मिळाले पाहिजेच आणि त्याच बरोबर ग्राहकांना पण समाधान कारक सेवा देताना व्हॅल्यूअरला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आज बँका अथवा तत्सम संस्था या सोने तारण कर्जयोजनेतून नफा कमावत असतात परंतु यातील महत्त्वाचा घटक व्हॅल्यूअरला त्याच्यावरील जोखमीच्या तुलनेत योग्य फी मिळावी, हा या संस्थेचा उद्देश आहे.

या संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम काळे, तज्ज्ञ मार्गदर्शक आनंद पेडणेकर व भरत ओसवाल, संघटक भैय्याभाऊ भामरे, तर कार्याध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के व चेतन राजापूरकर, सचिव संजय वाघ, कोषाध्यक्ष दिपक देवरुखकर, सह कोषाध्यक्ष कालीदास कांदलगावकर असे आहेत.

असोसिएशनच्या कोथरूड विभागाचे अध्यक्ष म्हणून विशाल मैड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लवकरच असोसिएशनची सभासद नोंदणी महाराष्ट्रातील गावोगावी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे सहसचिव सतिश पितळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.