Maharashtra News : राज्यात 12 डिसेंबरला महालोकअदालत, दावा निकाली काढण्यासाठी ‘व्हॉट्सअप कॉलिंग’ला परवानगी

एमपीसीन्यूज : महाराष्ट्रातील सर्व न्यायालयांमध्ये 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतीमध्ये दावा निकाली काढण्यासाठी ‘व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंग’ या सुविधेचा वापर करण्यास महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे परवानगी देण्यात आली आहे. संबंधित दाव्यांमधील पक्षकारांची अधिकृत ओळख तपासून व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंगचा वापर करुन दावा निकाली काढता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे याबाबत राज्यातील प्रमुख जिल्हा न्यायाधीश, विधी सेवा प्राधिकरणांचे सचिव यांना हे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या आठ महिन्यात लोकअदालतीचा उपक्रम कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वेळोवेळी रद्द करावा लागला होता. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे 12 डिसेंबर रोजी देशात एकाच दिवशी महालोकअदालत आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित असलेले दावे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली काढता यावेत म्हणून 2013 पासून लोकअदालत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते आहे. तडजोडयोग्य दावे, दाखलपूर्व दावे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी लोकअदालतीपुढे ठेवण्यात येतात.

भूसंपादन, धनादेश न वटणे तसेच वैवाहिक स्वरुपाचे दावे मोटार अपघाताचे दावे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतीचे कामकाज पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पॅनेलसमोर हा दावा ठेवण्यात येतो.

या पॅनेलमध्ये न्यायाधीश, वकील, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. दोन्ही बाजूच्या पक्षकारांशी चर्चा करुन त्यांच्यात असलेल्या वादावर तोडगा काढून सामंजस्याने दावा निकाली काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. या उपक्रमामुळे पक्षकारांना जलद न्याय मिळण्याबरोबर दाव्यासाठी खर्च होणारा पैसा आणि वेळ वाचण्यास मदत होते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार दर दोन महिन्यांनी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. तसेच काहीवेळेस विशेष लोकअदालतीचे आयोजन ठराविक क्षेत्रातील दाव्यांसाठी केले जाते.

12 डिसेंबर राज्यातील न्यायालयांमध्ये होणाऱ्या या उपक्रमात व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंग या सुविधेचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात येऊ न शकणाऱ्या पक्षकाराची अधिकृत ओळख तपासून दावा निकाली काढता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.