Maharashtra Police News : अखेर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली; हेमंत नगराळे होणार मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज – सचिन वाझे प्रकरणावरून मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा रंगली होती. त्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली होणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र काही दिवसांच्या चर्चांच्या वावड्यांना आज काहीसे मूर्तरूप मिळाले असून मुंबईच्या पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (मंगळवारी, दि. 17) ट्विटरद्वारे ही माहिती दिली. हेमंत नगराळे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त होणार आहेत. तर उचलबांगडी झालेले पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येणार असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घराच्या बाहेर सापडलेली कार आणि त्यातून सुरु झालेले राजकारण सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेमार्गे आतापर्यंत मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीपर्यंत येऊन पोहोचले आहे. हे प्रकार खूप मोठे असून यात आणखी अनेक नवीन खुलासे होणार असल्याचे विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून गृह विभाग काढून घेतला जाणार असल्याची देखील चर्चा रंगली होती. त्यानंतर अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली कार प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांनी व्यवस्थितपणे सांभाळले नाही, असा ठपका ठेऊन पोलीस आयुक्तांच्या बदलीचे वारे वाहू लागले.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असणारी कार सापडल्याच्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील महत्वाचा दस्तऐवज विरोधी पक्षाकडे गेल्याने पोलीस दलातील कोणीतरी फुटीर असल्याचेही सांगण्यात आले. हे प्रकरण आज मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर येऊन थांबले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.