Pune News : कोरोना मृतांच्या कुटुंबियांना चार लाखाचे अनुदान द्यावे

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांची केंद्र सरकारकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सरसकट चार लाख रुपयाचे अनुदान देऊन मोदी सरकारने आपल्या कर्तव्याचे पालन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबतचे निवेदन ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

प्रथमेश आबनावे म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्युएचओ) अहवालानुसार, कोरोना काळात सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत. आतापर्यंत 47 लाखाहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला असून, सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांच्या दहापट आधिक ही संख्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी आकड्यातील हा घोळ समोर आणला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याऐवजी त्यांची खोटी आकडेवारी सांगणारे असे हे खोटारडे केंद्र सरकार आहे.”

“भाजपला जनतेशी नव्हे, तर केवळ सत्ता राखण्याशी मतलब आहे. हे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून जाणवते. भाजप सरकारच्या काळात आरोग्य सेवांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. सन 2020 या वर्षात 72 टक्के मृत्यू हॉस्पिटलच्या बाहेर झाले आहेत. हे आकडे भाजप सरकारच्या आरोग्य सेवेची भयावह स्थिती दाखवत आहेत. ऑक्सिजन कमतरतेमुळे आणि लॉकडाऊन काळात पायी चालत जाणाऱ्या मजूर, कामगारांच्या मृत्युला देखील सरकार जबाबदार आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सरकार नागरिकांना संकटाच्या खाईत ढकलत आहे,” अशी टीकाही आबनावे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.