Maharashtra : पूरस्थितीमुळे ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती

एमपीसी न्यूज – राज्यातील पूरपरिस्थितीमुळे ‘शिवस्वराज्य’ यात्रा पूरपरिस्थिती निवळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार यात्रा स्थगित करत पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांच्या मदतकार्यावर लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार, यात्रेचे प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साता-यात पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे या बांधवांना मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब यांच्या आदेशानुसार यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते पूरग्रस्तांना मदत करत आहेत.

शिवनेरीवरुन 6 ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात आली होती. 6 ते 28 दरम्यान यात्रेचा पहिला टप्पा होता. महाराष्ट्रातील 80 विधानसभा मतदारसंघात ही यात्रा जाणार होती. शिवनेरीवरुन सुरु झालेली यात्रा राजगुरुनगर, शिरुर, पारनेर, अहमदनगर मार्गे काल नाशिकला गेली होती. संध्याकाळी नाशिक जवळील सटाणा येथे जाहीर सभा झाल्यानंतर पूरपरिस्थितीमुळे यात्रा स्थगित करण्यात आली आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्हयाला पुराने वेढले आहे. या पुरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतकार्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.