Pune : महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवो; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गणरायाला साकडे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ गणेशोत्सव

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगडूशेठ गणपती चरणी केलेल्या अभिषेकातून केली. गणरायाला अभिषेक करताना गुरुजींनी केलेल्या मंत्रपठणातून संपूर्ण महाराष्ट्राचे कल्याण होवो, अशी प्रार्थना करण्यासोबतच पुढील काळातही मुख्यमंत्रीपद मिळू देत, असे पौरोहित्य करणा-या गुरुजींच्या मंत्रपठणाला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा देत गणरायाचरणी जणू साकडे घातले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १२७ व्या वर्षानिमित्त ॅगणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या श्री गणेश सूर्यमंदिरात गणरायाचे दर्शन घेण्यासाठी व अभिषेकासाठी फडणवीस यांनी आर्वजून हजेरी लावली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच खासदार संजय काकडे, भाजपा पुणे शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, दिलीप कांबळे हे देखील यावेळी उपस्थित होते. फडणवीस यांनी गणरायाचे पूजन करीत आरती देखील केली. ट्रस्टतर्फे त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

लष्कर सदन कमांड चे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल एस.के.सैनी, मेजर जनरल नवनीत कुमार, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसकर, कलादिग्दर्शक नितीन देसाई, उद्योजक अविनाश भोसले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विश्वजीत कदम, अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.

भारतीय संघातील क्रिकेटपटू केदार जाधव याने घेतले दर्शन
भारतीय संघातील क्रिकेटपटू केदार जाधव याने देखील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. तो म्हणाला, भारतीय संघाला मिळालेल्या यशाबद्दल बाप्पाचे धन्यवाद मानतो. दरवर्षी बाप्पाकडे काही तरी मागणे मागत असतो, परंतु या वर्षी गणरायाला फक्त धन्यवाद देतो. बाप्पाने मला खूप भरभरून दिले आहे, यापुढेही देईल अशी आशा व्यक्त करतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.