Pimpri : मोदी सरकार जुमलेबाज, विकास दरात महाराष्ट्र पिछाडीवर – पृथ्वीराज चव्हाण 

शहर काँग्रेसच्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

एमपीसी  न्यूज –   केंद्र सरकारने भारताच्या संरक्षणासाठी राफेल विमान खरेदीचा करार करताना  40 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, हा जागतिकस्तरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. तसेच केंद्र व राज्यातील सरकार जुमलेबाज असून त्यामुळे महाराष्ट्राचा विकासदर पिछाडीवर असल्याचा आरोप, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड येथे केला.
   पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने रविवारी तळवडे (निघोजे, दि. 21 ऑक्टो. 18) येथे सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांच्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, शिबिराचे प्रशिक्षक आमदार रामहरी रुपनवर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार शरद रणपिसे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कविचंद भाट, मागासवर्गीय सेल प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, श्यामला सोनवणे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, पुणे मनपाचे नगरसेवक अरविंद शिंदे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, पुणे मनपाचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, विष्णुपंत नेवाळे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादल शहराध्यक्ष मकर यादव आदी उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले की, सध्या देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वॉलस्ट्रीट जर्नलने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार 2018 या वर्षात भारतीय चलनाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सतत पिछाडीवर जात आहे. गेल्या चार वर्षांत 48 हजार कोटींची गुंतवणूक देशाबाहेर गेली आहे. प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची थकीत कर्जे वाढत चालली आहेत. त्यातच आयएफएलएसचा आर्थिक घोटाळा समोर आला असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. युपीएच्या कार्यकाळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 47 होती ती ऑक्टो. 2018 मध्ये 73 रुपयांवर आली असून रुपयाचा हा निचांक आहे. भारतीय चलनाची किंमत घटल्यामुळे आयात महाग झाली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ही वारेमाप वाढ झाली आहे. युपीएच्या सत्ताकाळात आयात आणि व्हॅट 25 टक्के होता तो आता 39 टक्के आकारला जातो. मोदी सरकारने साडेचार वर्षाच्या काळात 21 लाख कोटींपेक्षा अधिक कर जमा केला. मात्र, जनतेला अच्छे दिन पहायला मिळाले नाहीत. वाढीव कर आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिकांना चढ्यादाराने इंधनाची खरेदी  करावी लागत असून त्याचे चटके सामान्यांना सोसावे लागत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शेतक-यांना कर्ज माफ केल्याचे जाहीर केले. परंतु, अद्याप शेतक-यांचे कर्ज माफ  झालेले नाही. सिडकोचा जमीन व्यवहार आणि प्रकाश मेहता यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. येत्या निवडणुकीत या सर्व  प्रश्‍नांची उत्तरे सत्ताधा-यांना द्यावीच लागतली. सरकारचा भ्रष्ट कारभार जनता पाहत असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा  भ्रष्टाचार जनतेच्या समोर मांडावा. निवडणुकीत भाजपला घरी बसवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे ही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
    प्रास्ताविक आ. रामहरी रुपनवर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.