Lonavala : महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी रस्ता प्रकल्पाचा शुभारंभ 

एमपीसी न्यूज – लोणावळा ते पवनानगर या महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी प्रकल्पाच्या 141 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. 

यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय तथा बाळा भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, नगर‍ाध्यक्षा सुरेखा जाधव, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड, उपसभापती शांताराम कदम, मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे, रविंद्र भेगडे, कुसुम काशिकर, अलका धानिवले, राजश्री राऊत, जिजाबाई पोटफोडे, भास्करराव म्हाळसकर, एकनाथ टिळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्याकरिता पर्यटनस्थळांवर उभारण्यात येणार्‍या पहिल्या जनसुविधा केंद्राचा शुभारंभ देखील लोणावळा शहरातील रायवूड पार्क याठिकाणी करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आजपर्यंत रस्ते कामाकरिता अपुरा निधी मिळत असल्याने कामे दर्जेदार होत नव्हती. सध्या राज्यात 1700 कोटी रुपयांची 10 हजार किमी अंतराची कामे सुरु आहेत. येत्या वर्षभरात राज्य खड्डे मुक्त होईल तर पुढील दोन वर्षात राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

लोणावळा पवनानगर या रस्त्याची ओळकाईवाडी ते औंढे औंढोली दरम्यान मोठी दैनावस्था झालेली असल्याने नागरिकांना गैरसोयीचा मोठा सामना करावा लागत होता. हा रस्ता झाल्याने नागरिकांची मोठी समस्या सुटणार आहे. सोबतच पवनानगर भागातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड व आमदार बाळा भेगडे यांनी केले तर अर्जुन पाठारे यांनी सूत्रसंचालन केले. सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.