Pimpri: फुले स्मारक इमारत महिलांसाठीच वापरावी, अन्यथा आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिलांसाठी बांधण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले इमारतीमधील विभाग दुसरीकडे स्थलांतरित करावेत. त्याठिकाणी महिलांसाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, प्रशिक्षण वर्गांसह विविध उपक्रम सुरू करावेत. सावित्रीबाई फुले यांची तीन जानेवारी रोजी जयंती आहे. त्यापूर्वी इमारतीचा वापर फक्त महिलांसाठी करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या महिलांनी दिला आहे.

माजी महापौर अनिता फरांदे, शिवसेना महिला संघटिका सुलभा उबाळे, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता ताम्हाणे, कविता खराडे, भारती चकवे, वंदना जाधव, समता परिषदेचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर भुजबळ यांनी आज (सोमवारी) इमारतीची पाहणी केली. तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतिदिनी या सर्व इमारतीचा वापर महिलासांठी झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सुलभा उबाळे म्हणाल्या की,  पिंपरी महापालिकेच्या वतीने महिलांसाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याकरिता ही इमारत बांधण्यात आली आहे. परंतु, या इमारतीमध्ये महापालिकेचा क्रीडा विभाग सुरू केला आहे. स्थापत्य विभागाची कागदपत्रे ठेवण्यासाठी गोदाम म्हणून या इमारतीचा वापर केला जात आहे. जे उद्देश डोळ्यांसमोर ठेवून इमारत बांधली आहे, तो उद्देश पूर्ण होत नाही. सर्व इमारतीचा वापर महिलांसाठीच करावा. तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यापूर्वी महिलांसाठी विविध उपक्रम सुरु करण्याकरिता ही इमारत देण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अनिता फरांदे म्हणाल्या की, दोन वर्षांपासून इमारत तशीच आहे. तातडीने इमारतीचा ताबा महिलांसाठी देण्यात यावा. महिलांसाठी विविध उपक्रम सुरू करावेत. महापालिकेचे विभाग स्थलांतरित करण्यात यावेत.

गिरीजा कुदळे म्हणाल्या, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दारे खुली केली. परंतु, महापालिका महिलांच्या प्रशिक्षणासाठी इमारत देत नाही. ही शोकांतिका आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 27 लाख आहे. त्यामध्ये महिलांची संख्यादेखील मोठी आहे. या इमारतीमध्ये महिलांशी निगडित असलेला महापालिकेचा महिला बालकल्याण विभाग सुरू करावा. यूपीएससी, एमपीएससीचे अभ्यासवर्ग करावेत. तीन जानेवारीपूर्वी इमारतीचा ताबा देण्यात यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.