Mumbai News : 12 आमदार निलंबनासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचले : सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज : लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात महाविकास आघाडीने षडयंत्र रचून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले, अशी टीका आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी प्रतिविधानसभेत बोलताना केली. महाविकास आघाडीने पुण्याचा विकासही ठप्प केला, असा आरोपही आमदार शिरोळे यांनी केला.

अल्पकाळ अधिवेशन कसे घ्यावे याचे धडे भारतातल्या सर्व राज्यांनी महाविकास आघाडीकडून घ्यावे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात सोमवारी जे घडले तो इतिहासातील काळा दिवस म्हणता येईल. याच दिवशी लोकशाहीच्या मंदिरात षडयंत्र रचून अयोग्य पद्धतीने भाजप आमदारांना एक वर्षाकरीता निलंबित करण्यात आले, असे आमदार शिरोळे म्हणाले.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पुण्यातील वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकारने सर्व कामे ठप्प केली. प्रवासी केंद्रीत पब्लिक ट्रान्स्पोर्ट सिस्टिम उभारण्याचे देवेंद्रजी फडणवीस यांनी योजले होते.

तत्काळ काम चालूही झाले. स्वारगेट, शिवाजीनगर येथे बस, रिक्षा, टॅक्सी, रेल्वे, मेट्रो सेवांचे एकत्रिकरण करून प्रवाशांना प्रवास सुखकर होईल असे योजले होते. स्वारगेट, शिवाजीनगर येथे मल्टिनोडल हब चे काम चालू झाले. महाविकास आघाडी सरकारने ते कामही ठप्प केले. शिवाजीनगर बस स्थानक स्थलांतरित झाल्यावर अनेक समस्या वाढल्या.

त्या दूर करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने काहीच कार्यवाही केलेली नाही. गेली दीड वर्षे पीएमपी बससेवा तोट्यात आहे. त्यांचा वाहन आणि पर्यावरण कर माफ करावा असे पत्र परिवहन मंत्री परब यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिले. त्यावर उत्तर नाही, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी भाषणात दिली.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात आलेली नाही. सरकारकडे पैसे नाहीत अशी सबब देऊन नवीन भरती थांबविण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे कोणताही नवा प्रकल्प चालू नसताना सल्लागाराला सरकार पैसे देत आहे. हा कारभार दुतोंडी नाही का, असा सवाल आमदार शिरोळे यांनी केला आणि महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभाराबद्दल निषेध नोंदविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.