Graduate Constituency Elections : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांचा विजय

अधिकृत घोषणा बाकी

एमपीसी न्यूज  : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. पदवीधर, शिक्षक आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर  निवडल्या जाणाऱ्या सदस्यांची निवड होणार आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune graduate constituency election) महाविकास आघाडीचे अरुण लाड (Arun Lad) यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. अधिकृत निकाल येण्याआधीच मतमोजणी केंद्राबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार अरुण लाड यांना एक लाख 21 हजार मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) यांना 72 हजार मतं मिळाली आहेत. लाड यांना तब्बल 49 हजार मतांची आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे, अद्याप निकालाची अधिकृत घोषणा बाकी आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होईल असे म्हटले जात होते. परंतु आतापर्यंतच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक एकतर्फी झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत.

औरंगाबादेत दुसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांची मुसंडी, 34 हजार मतांची आघाडी

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण 34 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु आहे. रात्री जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतमोजणीच्या दोन फेऱ्यांमध्ये निकालाचे कल स्पष्ट झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून जल्लोष सुरु आहे.

नागपुरात महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी यांना आघाडी

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी चुरशीची लढत अपक्षित होती. या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहेत, तर दुसऱ्या फेरीतही भाजप उमेदवार पिछाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना 7262 मतांनी आघाडी मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.