Pimpri News : मतविभागणी, बंडखोरी टाळण्यासाठी महाविकासआघाडीचा ‘स्वबळा’चा प्रयोग?

एमपीसी न्यूज  (गणेश यादव) – पिंपरी-चिंचवडचा आगामी महापौर शिवसेनेचाच असणार, राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व परिस्थितीनुसार निर्णय घेणार तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार…! या राज्यात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडीतील तीनही पक्षाच्या भूमिकांचा अन्वयार्थ विचारात घेतला असता तीनही पक्षांना मतविभागणी आणि बंडखोरी होण्याच्या समस्येने ग्रासले आहे.

त्याचा फायदा भाजप उचलू नये. यासाठी प्रारंभी महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवेल अशी भूमिका घेण्या-या तीनही पक्षांनी आता ‘यू-टर्न’ घेत एकप्रकारे स्वतंत्र लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूकपूर्व नव्हे तर निवडणुकीनंतर महाविकासआघाडी करण्याबाबत खलबते सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील जवळपास 10 महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 22 मध्ये होण्याची शक्यता आहे. एक सदस्यीय की द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुक्ता दिसून येत आहे. आजी-माजी नगरसेवकांसह सर्वांकडून निवडणूक विभागात प्रभाग रचनेबाबत विचारणा केली जात आहे.  द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक होईल अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

मागील निवडणुकीदरम्यान राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेत घवघवीत यश मिळविले. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, नागपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा रोवला. मुंबई, ठाणे महापालिका शिवसेनेने राखल्या. तर, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गडांना सुरुंग लावले. पुणे, पिंपरी-चिंचवडची सत्ता राष्ट्रवादीकडून हिसकावून घेत भाजपने पवारांना मोठा धक्का दिला. तर, नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेला धक्का दिला. तर, नागपूरात काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

ज्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चाव्या आहेत. त्यांचे विधानसभा निवडणुकीत प्राबल्य राहते. म्हणून या निवडणुकांकडे ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिले जाते. पक्ष विस्तार, व्यापक जनाधार मिळविण्यासाठी या निवडणुका महत्वाच्या ठरतात. तळागळातील कार्यकर्त्यांना संधी देता येते. भाजपने मागील निवडणुकीत शिवसेनेसाठी अस्तित्वाची ठरलेल्या मुंबईत शिवसेनेला घाम फोडला. 37 पासून 83 जागांपर्यंत झेप घेतली. आता भाजपला हाच कित्ता सगळीकडे राबवायचा आहे. आगामी काळात होणा-या महापालिकांच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांच्यापासून केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांची फौज तयार आहे. भाजपने गांभीर्याने निवडणुका लढविण्याचा निर्धार केला.  भाजपमध्ये ब-याच घडामोडी घडत आहेत. त्यावर महाविकास आघाडीचेही बारकाईने लक्ष आहे.

मतविभागणी, बंडखोरी होऊन भाजपला फायदा होऊ नये यासाठी ‘महाविकासआघाडी’कडून खबरदारी!

मागील दीडवर्षांपासून राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकासाआघाडीचे सरकार आहे. महाविकासआघाडीने विधानपरिषदेच्या एकत्रित निवडणूक लढवत यश मिळविले. पण, जागा कमी आणि इच्छूक जास्त असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविणे शक्य होणार नाही. पिंपरी-चिंचवडची महापालिकेची निवडणूक 2011 च्या जणगणनेनुसारच होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार नसून 128 च नगरसेवक असणार आहेत. तीनही पक्षांचे कार्यकर्ते आणि जागा फक्त 128 असणार आहेत.

महाविकासआघाडी झाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता असून मतविभागणीचा फायदा सत्ताधारी भाजपला होऊ शकतो. बंडखोरी होऊ नये यासाठी महाविकासआघाडीकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यादृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. मतविभागणी, बंडखोरीचा भाजपला फायदा होऊ नये यासाठी महाविकासआघाडीकडून स्वबळाचा प्रयोग केला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच या तीनही पक्षांकडून स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज केले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर विराजमान करण्यासाठी साध्या बहुमताचा आकडा 65 आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकरुन ज्याला साधे बहुमत मिळेल. ज्याच्या सर्वाधिक जागा असतील. त्या पक्षाचा महापौर करायचा आणि सत्ता विभागून घ्यायची, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या गोटात सुरु आहे.

भाजप-मनसेची युती होणार?
भाजपला मित्र पक्षाची गरज असून मनसेसोबत हातमिळविणी करण्याची चाचपणी सुरु आहे. पण, मनसेची प्ररप्रांतीयाबाबतची भूमिका त्यासाठी अडचणीची ठरत आहे. त्यातूनही तोडगा निघत पिंपरीत भाजप-मनसेची युती झाल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो. दोनही पक्षाला फायदा होईल का?, शहरात मनसेची ताकद मर्यादित असून एकच नगरसेवक आहे. शहराध्यक्ष सचिन चिखले संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. संघटना बांधणीवर भर देत आहेत.  भाजप-मनसे युती झाल्यास त्याचा राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसला किती फटका बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले, ”महापालिकेची निवडणूक स्वबळावर की महाविकास आघाडीत लढवायची याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. श्रेष्टींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील. पक्षाची तयारी सुरु असून वॉर्डस्तरीय काम सुरु आहे. सेलच्या बैठका चालू आहेत”.

शिवसेना शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले म्हणाले, ”महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होईल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. राष्ट्रवादी-शिवसेनेचा एकत्र जाण्याचा निर्णय असल्याचे दिसत आहे. त्यावर अंतिम निर्णय आलेला नाही. त्यामुळे त्याबाबत जास्त भाष्य करणे योग्य नाही. निवडणुकीच्या दृष्टीने संघटनेचे काम सुरु आहे”.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, ”काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले. निवडणुकीला अवकाश आहे. तोपर्यंत नेत्यांचे मतपरिवर्तन झाले. तर, आघाडी होऊ शकते. सध्या तरी स्वबळावर लढायचे हे निश्चित असून आम्ही कामाला लागलो आहोत. स्वबळावर लढून निवडणुकीनंतर महापालिकेत महाविकासआघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही”.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, “भाजप व मनसेच्या युतीबाबत राजसाहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. युती होईल किंवा नाही. याची वाट न बघता आमची निवडणुकीची तयारी सुरु आहे. लवकरच पक्ष कार्यालयाच्या उद्घघाटनासाठी राजसाहेब शहरात येणार आहेत”.

भाजपचे संघटन सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात म्हणाले, “महाविकास आघाडी एकत्र किंवा वेगळे लढले तरी, त्याचा भाजपला काही फरक पडणार नाही. भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमची बूथ रचना सक्षम आहे. मागील पाच वर्षांत जनतेची केलेली कामे या जोरावर भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.