Chinchwad :  मोहननगर, रामनगर, विद्यानगर, काळभोरनगर परिसरात विजेचा लपंडाव

महावितरणने कायमस्वरूपी तोडगा काढावा; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांची मागणी

एमपीसी न्यूज –  चिंचवड, काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. (Chinchwad) त्यामुळे या भागातील नागरिक विजे अभावी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तत्काळ या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चिंचवड, काळभोरनगर मोहननगर, रामनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर आदी परिसरात सातत्याने खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. सोमवारी (दि. 8) मध्यरात्री आणि मंगळवारी (दि.9) सकाळी पुन्हा विजेचा लपंडाव अनुभवण्यास मिळाला. त्यामुळे येथील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. वीजपुरवठ्यातील दुरस्तीसाठी सातत्याने या परिसरात वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे.

Maharashtra Political Crises : उद्धव ठाकरेंना धक्का, शिंदे सरकार बचावलं, 16 आमदार अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे!

सोमवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास अचानक या परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झाला. सध्या उन्हाळा सुरू असल्याने नागरिक असह्य उकाड्याने हैराण झाले होते. खंडित वीजपुरवठ्यामुळे फॅन, कुलर, एसी आदी साधने बंद पडल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मंगळवारी सकाळी देखील परिसरातील वीजपुरवठा दोन ते तीन वेळा खंडित झाला. परिसरामध्ये वारंवार खंडित वीजपुरवठ्यावर महावितरणने कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

सध्या ऊन व अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे. थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर प्रचंड उकाडा जाणवत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना फॅन, कुलर, एसीची गरज असते. मात्र, अशाच वेळी मोहननगर, रामनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर परिसरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. वास्तविकता ऊन्हाळ्यात वीजेची मागणी वाढत असताना महावितरणने अधिक खबरदारी घेणे अपेक्षित आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी ही स्थिती आहे. पावसाळ्यात काय परिस्थिती होईल, याची कल्पनाच न केलेली बरी, असेही काळभोर यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.